भाजपने सुधार समितीचे नियम धाब्यावर बसविले :-
मुंबई— सुधार समितीत गैरहजर असलेल्या कोणत्याही सदस्याला कोणताही प्रस्ताव पुन्हा पटलावर ठेवून चर्चा करण्याचा अधिकार असताना भाजपने मात्र सदस्यांच्या या नैसर्गिक हक्काची पायमल्ली केली. शिवसेनेने मेट्रोचा प्रस्ताव पुन्हा पटलावर ठेवून चर्चा करण्याची मागणी केलेली असताना भाजपने सुधार समितीत ही मागणी फेटाळून लावून समितीचेच नियम धाब्यावर बसविल्याने संतप्त झालेल्या शिवसेना सदस्यांनी भाजपच्या नियमबाह्य काम करण्याच्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवत सभात्याग केला. मेट्रो प्रकल्पाच्या कामात गिरगावमधील मराठी माणूस बेघर होणार आहे. या मराठी माणसाला त्याच परिसरात घर देण्याची शिवसेनेने जोरदार मागणी लावून धरली आहे. तसेच हुतात्मा चौकालाही या प्रकल्पाच्या कामामुळे धक्का पोहचणार असल्याने हुतात्मा चौकाच्या परिसरात हा प्रकल्प राबवू नये अशी मागणी शिवसेनेने या आधीच केली आहे. शिवसेनेचा विरोध असतानाही सुधार समितीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. समितीच्या नियमानुसार एखाद्या प्रस्तावावर चर्चा करायची असेल आणि तो प्रस्ताव पुन्हा पटलावर ठेवायचा असेल तर त्या दिवशी गैरहजर असलेल्या सदस्याने समिती अध्यक्षांना तसे पत्र देऊन तो प्रस्ताव पुन्हा पटलावर ठेवण्याची मागणी करायची असते. त्यानुसार मेट्रोचा प्रस्ताव मंजूर झाला त्या दिवशी सुधार समितीत गैरहजर असलेल्या सुधार समिती सदस्या शुभा राऊळ यांनी मेट्रोचा प्रस्ताव पटलावर ठेवायची मागणी केली. तसे पत्रही त्यांनी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांना दिले होते. भाजपचे नगरसेवक आणि सुधार समितीचे अध्यक्ष असलेल्या गंगाधरे यांनी हे पत्र फेटाळून लावून मेट्रोच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी भाजपच्या या अरेरावीविरोधात आज सभात्याग केला. शुभा राऊळ, श्रद्धा जाधव आणि राजू पेडणेकर यांच्यासह सर्व शिवसेना नगरसेवकांनी भाजपचा हा निर्णय नियमबाह्य असून समितीचे कामकाज नियमबाह्य होत असल्याचा आरोप केला.
No comments:
Post a Comment